इ.स. १७३३ मध्ये सिद्धी व पेशवे यांच्यातील तहानुसार सुरगड किल्यावर पेशव्यांचे निशाण चढले. गडावर असलेल्या शिलालेखावरून असे दिसून येते कि, किल्ला हबशांनी बांधला होता पण गडाचा हवालदार व गड बांधणारा दोघेही मराठी होते. इ.स. १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला.
गडावरची भ्रमंती आणि अवशेष
वैजनाथ गावातून घळीच्या वाटेने जाताना सध्या पायऱ्या तुटून कातळटप्पा तयार झाला आहे. पण पूर्वी हाच राजमार्ग (मुख्य वाट) होता, कारण वाटेत खडकात खोदलेल्या , तसेच काही बांधीव पायऱ्या आजही दिसतात. घळीच्या शेवटच्या भागात एका बुरुजाशेजारीच दरवाजाचे अवशेष आहेत. पूर्वी इथे नक्कीच दरवाजा होता. या भग्न दरवाज्यातून आत आल्यावर खिंडीत उजवीकडे मारुती मंदिर आहे. मंदिर केव्हाच पडून गेले आहे, पण आत कमरेला खंजीर लावलेली मारुतीची मूर्ती चौथऱ्यावर आहे. मंदिरासमोरील कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. या पायऱ्यांवरूनच गडाच्या माथ्यावर पोहोचावे. प्रवेश केल्यावर डावीकडे कोठारसदृश बांधकाम दिसून येते. या बांधकामाचे छप्पर गेले आहे, फक्त भिंती शिल्लक आहेत. हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे.
गडावर घळीतून मारुती मंदिराजवळ प्रवेश होतो. हा प्रवेश दक्षिणेकडून होतो. कोठार पाहून माथ्यावरून उत्तरेला चालत राहावे. लगेच हेमाडपंथी मंदिराचे अवशेष दिसतात. येथे पूर्वी शिवमंदिर होते अशी माहिती मिळते. तसेच पुढे उत्तरेकडे चालत जावे. प्रथम खडकात खोदलेल्या टाक्यांचा समूह आहे. यापैकी एका टाक्याला चहुबाजूंनी भिंत बांधून उंची दिलेली आहे. मंदिराच्या अवशेषांचे दगड सिंहासनासारखे रचून ठेवलेले आहेत. पुढच्या टप्प्यात लगेच एका कातळसपाटीवर पाच खडकात खोदलेल्या टाक्यांचा समूह आहे. त्यात बारमाही पाणी असते. तिथून पुढे गेल्यावर एक भक्कम बुरुज किल्ल्यात मधोमध दिसतो. हा बुरुज तटबंदीत नाही. माथ्यावरील वाड्याच्या बांधकामातला हा बुरुज असावा असे वाटते. त्यामागून वाट गडाच्या उत्तर टोकाकडील माचीकडे उतरते. या माचीवर पूर्वेला कातळात खोदलेले एक टाके आहे. माचीची तटबंदी उत्तम आहे. घरीले गावातून येणारी वाट या माचीवर येते.
माचीच्या थोडे अलीकडे उतारावर एक मोठा घडीव आयताकृती दगड पडलेला आहे. यावर अत्यंत सुबक शिलालेख आहे. शिलालेख अरबी व देवनागरी या दोन लिपीमध्ये कोरलेला आहे. यातील माहिती पुढीलप्रमाणे :-
“ हा किल्ला सिद्दीसाहेब यांच्या हुकुमावरून बांधला. किल्ला बांधणाऱ्याचे नाव सूर्याजी व किल्याच्या सुभेदाराचे नाव तुकोजी हैबत होते ”.
टिप : दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे सुरगडावर दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या जातात.
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details