दुर्गवीर प्रतिष्ठान बेळगांव आणि चंदगड शाखेच्यावतीने किल्ले कलानिधीगड येथे गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शनिवारी दि. १७ मार्च रोजी सायंकाळी गडाकडे प्रस्थान करण्यात आले. फाल्गुन अमावस्या ध. छ. श्री संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शंभूराजेंचे स्मरण करून देव, देश आणि धर्मासाठी लढण्याची ताकद प्रत्येकाला मिळावी ही प्रार्थना करून लाठीकाठी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिक करण्यात आले. नंतर मशालीच्या उजेडात गड फेरी करण्यात आली.
रविवार दि. १८ मार्च गुढीपाडव्याच्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. पहाटे ५:३० वाजता गडाच्या महादरवाजाला फुलांनी सजवण्यात आले. गडावरील मंदीर सुध्दा सजवण्यात आले. पहाटे मशालिंच्या उजेडात महादरवाजा उजळून निघाला. रांगोळी, तोरण, गुढी आणि परम पवित्र भगवा ध्वज यामुळे महादरवाजाला सुध्दा पुन्हा एकदा शिवकाळातील दिवस आठवले असतील? नंतर महादरवाजाचे पूजन करून, गडावरील मंदिरांचे पूजन करण्यात आले. तसेच गडावरील तोफा ज्या गडाखाली जंगलात पडल्या होत्या सध्या मागील वर्षी गडवरती चढवण्यात आल्या आहेत त्यांचेही पूजन करण्यात आले. ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र आणि आरत्या म्हणण्यात आले. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि दुर्गवीर करत असलेल्या संवर्धनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
तुम्हालाही या कार्यात भाग घ्यावयचा असेल अथवा मदत करावयाची असेल तर बेळगांव परिसरातील इच्छुकांनी संपर्क करावा.