गुढीपाडवा – चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षारंभ दिवस. हेच औचित्य साधुन आज २८ मार्च २०१७ या दिवशी कलनिधिगड़ावर गुढीपाडवा उत्साहात साजरा केला गेला.
आपले स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी असल्याने आणि गेला महिनाभर बलिदान मास गांभीर्याने पाळून, महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले कलानीधी गडावर त्यांचे स्मरण करून, येणाऱ्या नवीन वर्षांत छत्रपति शिवाजी महाराज- छत्रपति संभाजी महाराज यांच्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा निश्चय केला.
ठरवल्याप्रमाणे बेळगाव वरुन रात्रीच २५ जणांची कुमक घेऊन आम्ही कलानिधिगडाच्या दिशेने कूच केले. रात्री उशिरा गडावर पोहचुन मंदिराची स्वच्छता, देवतेची पूजा, प्रसाद करुन गुढीपाढवा आणि हिंदू नववर्षाची पूर्व तयारी सुरु केली.
गेली कित्येक वर्ष या गडाने जो सोहळा पाहिला नसेल तो सोहळा, ते चित्र आज कलानिधिगडाच्या अंगाखांद्यावर मिरवायच होत. हेच मनाशी पक्के करुन आम्ही गडाच्या तटबंदीवर रात्रीच्या अंधारात मशाली लावून गड उजळावयाच प्रयत्न केला. आज मशालींच्या उजेडात गड काही वेगळाच उठून दिसत होता. गेली कित्येक वर्षानंतर कुठेतरी महाराजांना, मावळ्यांना, याच स्वराज्याच्या शिलेदाराला, माझ्या गडाला पुन्हा ते दिवस दाखवायचा दुर्गवीर प्रतिष्ठानने प्रामाणिक प्रयत्न केला.
सकाळी ७ वाजनाच्या सुमारास कलिवडे-किटवडे गावातील ग्रामस्थ यांनी हजेरी लावून आमचा अजुन उत्साह वाढवला.
त्यानंतर गड़ावरील महादरवाजा, मंदिर, भगव्या पताकांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला. मग काय, हिंदु विजयध्वज उभा करण्याची लगबग सुरु झाली. सूबेदार काकांच्या मार्गदर्शनाखाली गडावरील महादरवाज्याची पूजा करण्यात आली नंतर मंदिरातील भवानी मातेची, गणपतीची, शिवपिंडीची तसेच विजयध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर देवतांची, शिवरायांची ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र म्हणून आरती करण्यात आली. तसेच त्यानंतर गडावर दुर्गवीर प्रतिष्ठानकडून श्रमदान आणि स्वच्छता करण्यात आली. गडाच्या ख़ाली असलेल्या चाळोबा मंदिरात स्वच्छता, भगव्या पताका, विजयध्वज उभा करुन देवतेची पूजा करण्यात आली. त्यानंतर गडाला भावपूर्ण पणे निरोप दिला.
या सर्व उपक्रमातबामू ताई लांबोर सरपंच, नारायण सुभेदार, नंदकुमार ढेरे, विजय गावडे, अशोक कदम, पांडूरंग पाटील, संजय मोरे, निव्रुत्ती पाटिल, सुभाष देसाई, अनिल केसरकर, बाबूराव जानकर, भिकाजी लांबोर, बाबू झोरे तसेच ग्रा पं सदस्य कलिवडे – कीटवडे, युवा कार्यकर्तेयांचे सहकार्य लाभले.
गडासाठी खरा भाग्याचा क्षण तर सायंकाळी उशिरा कलिवडे गावातील तरुणांनी गडाला आणि महाराजांना दाखवला. या समस्त गावक-यांनी गडाच्या खाली जंगलात कित्येक वर्ष खितपत पडलेल्या २ तोफांना पुन्हा गडावर नेऊन स्थानापन्न केले. या कार्यासाठी तमाम जनतेकडून शतशः आभार.
आजचा दिवस खरच सार्थकी लागला.
तुम्हालाही या गड़किल्ल्यांच्या संवर्धनात आणि शिवकार्यात सहभागी व्हायच असेल तर आमच्याशी संपर्क
करा…